संक्रांत
आजपासून 258 वर्षांपूर्वी हरयाणातील पानिपतावर लाख सव्वालाख माणसं उपाशी बसलेली होती. महिन्याभरापासून त्यांची आबाळ सुरू होती. खायला पुरेसं अन्न नव्हतं की थंडीत ल्यायला पुरेसे कपडे नव्हते. तरीही अशा ह्या अर्धपोटी लोकांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच एका प्रखर लढाईला सुरवात केली. त्यांच्या समोर उभ्या ठाकलेल्या एका बलाढ्य शत्रूवर त्यांनी प्राणपणाने हल्ला चढवला.
कोण होती ही लोकं?
त्यांना मराठे म्हणायचे,
मराठे, अनेक जातीचे मराठे होते त्यांच्यात. पाटील होते, देशमुख होते, चित्पावन होते, धनगर होते, देशस्थ, कऱ्हाडे, कुणबी, महार, माळी, तेली, कोळी, वंजारी सगळे होते. मुसलमानही होते. त्यांनाही मराठेच म्हणायचे. त्या दिवशी महाराष्ट्र एकजूट होऊन मराठा म्हणून लढला. बरोबर मध्यप्रांतालाही घेतलं. बुरंडी घाटावर पडलेल्या दत्ताजी शिंद्याचा अपमान पुण्यात बसलेल्या नानासाहेब पेशव्याच्या मनाला झोम्बला. पेशव्याच्या नैतृत्वाखाली लढायला मल्हारबा होळकरांना वाईट वाटलं नाही. जरीपटक्याखाली जमलेल्या सैन्यात जाती पाळल्या जात नसतीलच असं नाही पण तरी त्या सैन्यात जातींच्या भिंती नव्हत्या.
आयुष्य फार साधं आणि सरळ होतं. युद्ध करणे हा पोटापाण्याचा व्यवसाय होता, त्याला अजून अस्मितेची भरजरी किनार लाभली नव्हती.
14 जानेवारी 1761 च्या संध्याकाळी ज्यांची कत्तल झाली, ती मराठे म्हणून झाली. जे कैदी पकडून नेले गेले, त्यांना आजही मराठा बुगती आणि मराठा मारी म्हणतात. त्यांच्या जाती विरघळून गेल्यात, इतकंच काय धर्मही विरघळून गेलाय पण मराठा ही ओळख अजूनही कायम आहे.
पानपतच्या युद्धाला Third battle of Panipat म्हणतात, ती एक लढाई होती जी मराठे हरले. पण मराठे युद्ध मात्र जिंकले. अब्दालीने या लढाईचा इतका धसका घेतला की तो परत कधीच भारतात आला नाही. अफगाण सैन्याच इतकं नुकसान झालं की त्यांना भारतात राज्य करणे हा फायद्याचा व्यवहार वाटलाच नाही.
पानिपतानंतर अवघ्या दहा पंधरा वर्षात महादजी शिंद्यांनी नजीबखानाची कबर खोदून काढली. दिल्लीत पुन्हा मराठयांच्या शिक्याने बादशहा राज्य करू लागला. पानिपतानंतर कमीत कमी 30 35 वर्ष, मराठे मराठे म्हणूनच लढले.
कोणतेही युद्ध हे खरेतर फसलेले राजकारण असते. युद्ध म्हणजे आपापल्या हितासाठी झगडणाऱ्या दोन विचारांचा संघर्ष. "मराठा" हा एक विचार होता, छत्रपतींनी दिलेला. ह्या विचारातूनच महाराष्ट्र घडला. अब्दालीलाही अफगाण राष्ट्राचे जनक मानले जाते. वंश आणि धर्म यांच्या अतिरेकी अस्मितेच्या आहारी गेलेल्या अफगाण राष्ट्राचे काय झाले ते आपल्या समोर आहे, मग त्याच दगडावर आपण पुन्हा पाय का मारून घेतोय?
आज महाराष्ट्रात विचित्र परिस्थिती आहे, राष्ट्र म्हणून आपण अफगाणंच्या प्रचंड पुढे निघून गेलोय, पण दुर्दैवाने आपण आपली मराठा ही ओळख विसरून जातोय. जर आपण आपली ओळख, एका अजून मोठ्या संकल्पनेत विसर्जित करत असू तर ती ओळख विसरायलाही हरकत नाही, पण गंगा उलटी वाहायला लागलीय. आज आपण ब्राम्हण, मराठे, दलित आणि अजून फलाने ढिकाने होण्यात आपली अस्मिता शोधतोय.
या संक्रांतीला जेंव्हा आपण एकमेकांना तिळगुळ देऊ, गोड गोड बोला असं म्हणू, तेंव्हा 258 वर्षांपूर्वी त्या थंड मैदानावर खंदकात काकडून बसलेल्या, आणि दुसऱ्या दिवशी रक्ताळून तिथेच धारातीर्थी पडलेल्या तुमच्या नि माझ्या पूर्वजाची आठवण नक्की ठेवा. तो तिथे मराठा म्हणून गेला होता आणि मराठा म्हणूनच मेला होता.
आपल्यातील वाढत चाललेली दरी त्याच्या रक्तानेही भरली, तरी त्याला आनंदच होईल.
जय हिंद जय महाराष्ट्र